मुंबईत आगीचे सत्र सुरुच; विलेपार्ल्यात प्राईम मॉलला भीषण आग

मुंबई: मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून लागल्याच्या घटना समोर येत आहे. गुरुवारी पवई येथील कार सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा विलेपार्ले परिसरात एका मॉलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विलेपार्ल्यातील इर्ला मार्केट येथील प्राईम मॉलला भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

अचानक प्राईम मॉलला भीषण आग लागली. आग वाढत चालली असून परिसरात धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. आग वाढत असल्यामुळे इर्ला मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा मार्केट परिसर अतिशय गजबजलेला असून या ठिकाणी मोठी गर्दी असते तसंच या परिसरात अनेक दुकाने देखील आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या विक्रीसाठी हा बाजार ओळखला  जातो. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.

आगीची माहिती कळताच अग्निशम दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या एकूण 10 गाड्या घटनास्थळी आहेत. अग्निशमन दलाने ही लेवल-3 ची आग असल्याचे सांगितले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळावर पोलिसांनी देखील धाव घेतली आहे.