महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल, सर्वाधिक ९२ पुरस्कार महाराष्ट्राला

3

मुंबई: केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ९२ पुरस्कार पटकावत देशात अव्वल स्थान मिळवले आहे. शंभरहून अधिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला देशातील अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

देशात स्वच्छतेत प्रथम आलेल्या छत्तीसगडला मात्र ६७ पुरस्कार मिळाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्राने सर्वाधिक ९२ पुरस्कार पटकावले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने शनिवारी या वर्षी केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे निकाल जाहीर केले.

‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, २०२१’च्या ‘सर्वात स्वच्छ शहर’ श्रेणीमध्ये सुरत आणि विजयवाडा यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. इंदूर आणि सुरतने ‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२१’मध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी, नवी मुंबईने मागील वर्षीचे तिसरे स्थान गमावले असून यंदा या शहराला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र ‘कचरामुक्त शहर श्रेणीत’ नवी मुंबईने इंदूर, सुरत, नवी दिल्ली शहर, अंबिकापूर, म्हैसूर, नोएडा, विजयवाडा आणि पाटण या नऊ शहरांसह पंच तारांकित मानांकन मिळवले आहे.

‘सफाईमित्र सुरक्षा आव्हान’ श्रेणीत इंदूर, नवी मुंबई, नेल्लोर आणि देवास अव्वल कामगिरी करणारे शहरे ठरली आहेत. १० ते ४० लाख लोकसंख्येच्या श्रेणीत नवी मुंबईने देशातील ‘सर्वांत स्वच्छ मोठे शहर’ म्हणून पहिले स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रातील विटा हे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले सर्वांत स्वच्छ शहर ठरले आहे, त्यानंतर लोणावळा आणि सासवड यांचा क्रमांक लागतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे एका कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले. देशव्यापी स्वच्छता सर्वेक्षणात, २८ दिवसांत ४,३२० शहरांचा समावेश करण्यात आला आहे, ४.२ कोटी पेक्षा जास्त लोकांनी त्यांचा अभिप्राय नोंदवला.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.