पिंपरी चिंचवडमध्ये किरीट सोमय्या यांना शिवसेनेने दाखवले काळे झेंडे
पिंपरी: भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या रविवारी (दि. 21) पिंपरी-चिंचवड दौ-यावर होते. सोमय्या यांनी मोरवाडी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर निदर्शने करून सोमय्या यांना काळे झेंडे दाखवले. अचानक भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.
किरीट सोमय्या यांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर दौरा केला. दरम्यान रविवारी दुपारी सोमय्या यांनी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अर्जुन शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचा कथित घोटाळा बाहेर काढला. तसेच ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
दरम्यान, शिवसेनेला सोमय्या यांच्या दौ-याची माहिती मिळाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे आणि एक निवेदन घेऊन भाजप कार्यालय गाठले. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यालय असलेल्या इमारतीच्या गेटवर अडवण्यात आले. पोलिसांनी गेट बंद केले. गेटच्या आतील बाजूला भाजप कार्यकर्ते आणि बाहेरील बाजूला शिवसेना कार्यकर्ते असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. किरीट सोमय्या हे भाजप कार्यालयातून निघून पुढील कार्यक्रमासाठी जात असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन देण्यासाठी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांना बाजूला लोटत सोमय्या यांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत ‘किरीट सोमय्या हाय-हाय’ ‘या सोमय्याच करायच काय? खाली डोक वर पाय’ ‘शिवसेना जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली.