देवेंद्र फडणवीस हेच अजितदादांच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार – सुनिल शेळके

पुणे: आयकर विभागाने राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यासह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवर देखील गुरुवार (7 ऑक्टोबर) अचानक छापे मारले. यावेळी आयकर विभागाने मारलेल्या या छाप्यांबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय आयकर विभागाच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी केला.

आमदार शेळके म्हणाले, कोरोनाचे संकट, निसर्ग चक्रीवादळ, कोकणातील वादळ या महाराष्ट्रावर आलेल्या संकटात देखील हे सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादा काम करीत असताना काही भाजप नेते जाणीपूर्वक त्यांना बदनामी करण्याचा डाव आखत आहेत. यामागील खरे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासारखे नेते महाविकास आघाडी सरकारवर खोटेनाटे आरोप करून बदनामी करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहेत. पण, महाराष्ट्रातील सुज्ञ जनता या भूलथापांना कदापी बळी पडणार नाही.

अजितदादांनी कामाच्या जोरावर राज्यातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. इतर राजकारण्यांसारखे अजितदादा नागरिकांना ताटकळत ठेवत नाहीत. काम होणार असेल तर ते झटकण करतात आणि होणार नसेल तर तोंडावर होणार नाही असे सांगतात. राज्यातील तरुणांमध्ये दादांची मोठी क्रेझ असून दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ होत आहे. एक सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता अजितदादांकडे पाहत आहे.  त्यामुळे भाजपचा पोटशूळ उठला आहे. त्यातूनच केंद्रीय संस्थाचा गैरवापर करून त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास दिला जात आहे.