मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

5

मुंबई: गौतम अदानींच्या संपत्तीत गेल्या दोन वर्षामध्ये वेगाने वाढ झाल्याचे पहायला मिळाले. त्यांची संपत्ती एवढी वाढली आहे की आता गौतम अदानींनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अबांनींना पछाडत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये बुधवारी शेअर मार्केटमध्ये तेजी आल्यामुळे आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये त्याचवेळी घसरण झाल्यामुळे गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

रिलायन्सची एक मोठी डील सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत होणार होती. पण ही डील आता रद्द झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजला याचा फटका बसला असून त्यांच्या महसुलात मोठी घट झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये आज 1.44 टक्क्यांची घट होऊन, तो 2351.40 रुपयांवर बंद झाला आहे.

दरम्यान सातत्याने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 4.63 टक्क्यांची वाढ होऊन, तो 763 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी एंटरप्राईजच्या शेअर्समध्ये 2.08 टक्क्यांची वाढ होऊन, तो 1742 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या एकूण सहा कंपन्या लिस्टेड आहेत.

गौतम अदानींच्या संपत्तीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 55 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत केवळ 14.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 261 टक्क्यांनी गौतम अदानींची संपत्ती वाढली आहे. अदानींची संपत्ती ही 1,40,200 कोटींवरुन 5,05,900 कोटींवर गेली आहे. गेल्या एकाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 3,65,700 कोटींची भर पडली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.