जिओने ग्राहकांना दिला मोठा झटका, अनलिमिटेड प्रीपेड प्लान महागले; जाणून घ्या नविन दर

मुंबई: एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया रिलायन्स जिओनेहीने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. जिओच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. रिलायन्स जिओ च्या नवीन किंमती १ डिसेंबरपासून लागू होतील. नवीन किंमती लागू झाल्यानंतर ग्राहकांना प्रीपेड प्लान्ससाठी जवळपास ५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावे लागतील.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे दूरसंचार सेवा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारती एअरटेलने अर्थात एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लानच्या दरात सुरुवातीला वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वोडाफोन-आयडियानेही प्रीपेड प्लान्सचे दर वाढवले असून, या दोन कंपन्यांपाठोपाठ रिलायन्स जिओनंही प्रीपेड प्लान्समध्ये वाढ केली आहे.

रिलायन्स जिओने आपल्या अनलिमिटेड प्रीपेड प्लान्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना सर्वच अनलिमिटेड प्लानसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 75 रुपयांच्या जिओ फोन प्लानची किंमत आता 91 रुपये इतकी करण्यात आली आहे.

अनलिमिटेड प्लान्सच्या किंमतीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. 129 रुपयांच्या अनलिमिटेड प्लानची किंमत 155 रुपये झाली आहे. तर 149 रुपयांचा प्लान 179 रुपयांपर्यंत महागला आहे. 199 रुपयांचा प्लान 239 रुपयांना झाला असून, 249 रुपयांच्या प्लानसाठी आता 299 रुपये मोजावे लागणार आहेत.