मुंबईतील शाळा 15 डिसेंबर पासून सुरू; महापालिकेचा मोठा निर्णय
मुंबई: ‘ओमीक्रॉंन’ या कोरोनाच्या नवीन विषाणूच्या दहशतीमुळे धास्तावलेले मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबई हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा आता १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परतावून लावल्यानंतर कोरोनावर चांगले नियंत्रण आले. तिसऱ्या लाटेलाही आरोग्य यंत्रणेने थोपवून धरले होते. त्यामुळे राज्य सरकारने इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्याअनुषंगाने राज्यात पूर्व तयारी सुरू झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ‘ओमीक्रॉंन’ या विषाणूने दक्षिण आफ्रिका व काही युरोपियन देशांत डोके वर काढले. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका व युरोपियन देशांमधून भारतासह जगातील अन्य देशात हजारो नागरिक,पर्यटकांनी ये- जा केली असल्याने अवघे जग धास्तावले आहे. त्यामुळे राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिका शिक्षण खात्याचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत, मुंबई महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत गेल्या १० दिवसांत विदेशातून आलेल्या नागरिकांचा, पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे. आता १५ डिसेंबरला शाळा सुरू होणार असल्याने तोपर्यंत पालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाला आहे की नाही याबाबत आढावा घेण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.