उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डेक्कन अभिमत विद्यापीठाशी संबंधित महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थान सिंहगड, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली डेक्कन अभिमत विद्यापीठाशी संबंधित महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
डेक्कन कॉलेजच्या जागेसंदर्भातील प्रलंबित विषयांचे समग्र परीक्षण करून निर्णय प्रक्रियेला गती मिळावी यासाठी निवृत्त IAS अधिकाऱ्यांच्या समितीची नियुक्ती करण्याच्या सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
डेक्कन कॉलेजच्या जागेचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्यात विविध कायदेशीर गुंतागुंत आहेत. निवृत्त IAS अधिकाऱ्यांची समिती या विषयावर प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. या समितीने सर्व कायदेशीर बाजू, प्रशासकीय प्रक्रिया आणि जमिनीच्या वापराचा उद्देश तपासणे अपेक्षित आहे, जेणेकरून या दीर्घकाळ प्रलंबित वादावर तोडगा काढता येईल.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.