राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरू होणार, राज्य सरकारने जाहीर केली नियमावली
मुंबई: दक्षिण आफ्रिकेत आढळेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभराची चिंता वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू होणार का? होणार तर कधी सुरू होणार? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला होता. मात्र आता राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील म्हणजे शहरी भागात इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच शाळा सुरू करताना नेमकी कोणती खरबदारी घ्यावी, यासाठी राज्य सरकारने नियमावलीदेखील जारी केली आहे.
असे आहेत नियम :
1 शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात किंवा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण करणे आवश्यक.
2 विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरावी. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, एका वर्गात दोन बाकांमध्ये सहा फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे.
3 ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या तर महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अगोदर समिती गठीत आहे. या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी काही बाबींवर चर्चा करावी.
4 विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं शाळेत बोलवावं, एक बॅच पहिल्या दिवशी तर दुसरी बॅच दुसऱ्या दिवशी किंवा सकाळ दुपार सत्रामध्ये विभागणी करावी. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल.
5 शाळेत गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना परिसरात प्रवेश देऊ नये. कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे. वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी
6 कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अथवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठवले जावे.
7 विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्यध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. शिवाय, वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.