नाशिक महापालिका हद्दीतील शाळा १३ डिसेंबरपासून सुरु होणार

नाशिक: राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सरू होणार होत्या मात्र, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला. तसेच राज्यातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळायला लागले. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता नाशिकमध्ये शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे. येत्या १३ डिसेंबरपासून नाशिक मनपा हद्दीतील शाळा सुरू होणार असल्याची माहिती नाशिक मनपा शिक्षण विभागाने दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नाशिक मनपा हद्दीतील शाळा येत्या १३ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. ओमायक्रॉनचा परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण प्रशासनाने सांगितले होते. आणि आता ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाशिकमधील शाळा १३ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नाशिक मनपा शिक्षण विभागाने घेतला आहे.