जळगावात क्रुझरचा भीषण अपघात, ४ जण जागीच ठार
जळगाव: येथील नांदगाव रस्त्यावरील हिरापूर (ता. चाळीसगाव) गावाजवळ क्रूझर गाडी उलटल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.१) रात्री साडेदहाच्या सुमारास भावसार पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना प्राथमिक उपचारानंतर धुळे येथे रवाना करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव (ता. पाचोरा) येथील काही मजूर कामानिमित्त मनमाड गेलेले होते. आज क्रूझर गाडीने (क्रमांक : एमएच १३ एसी ५६०४) घरी डोंगरगावला परत येत असताना रात्री दहाच्या सुमारास चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील हिरापूर गावाजवळ क्रूझर भरधाव वेगात असल्याने अचानक घसरली. गाडी वेगात असल्याने रस्त्यावर आदळून झालेल्या अपघातात गाडीतील ४ जण जागीच ठार झाले.
हा अपघात इतका भीषण होता, की गाडीतील सर्वच्या सर्व मजूर गंभीर जखमी झाले, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. कमलेश हरी काटे, बापू सुभाष पाटील, शेखर राजेंद्र तडवी, अनिस तडवी, शाहरुख तडवी, चंदन हरी काटे, मुक्तार तडवी, दिलीप तडवी, विकास तडवी, सचिन तडवी, नाना प्रभाकर कोळी व इतर प्रवासी वाहनात होते.