नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू
नाशिक: बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी (ता. १४) सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरू होते. दरम्यान, ११ केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. त्यात बोलठाण (ता. नांदगाव) येथील अमोल हिंमतराव पाटील (वय ३०) यांचा समावेश आहे.
या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघा गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारा व खांब काढण्यासाठी सीमा सुरक्षा बलाने संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहूनही वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. जवान अमोलच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली.
सशस्त्र सीमाबलाच्या बिहार-नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत असलेला अमोल सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होता. ऐन तारुण्यात अपघातात जखमी झालेला असताना केवळ जिद्द आणि चिकाटीमुळे अमोलची सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात निवड झाली होती. नुकताच दिवाळीत अमोल बोलठाण येथे सुटीवर आला होता. या वेळी कन्यारत्न झाल्याचा आनंद सोहळा गावात स्नेहीजनांसोबत साजरा झाला. जाताना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीला सोबत घेऊन गेला होता. तारुण्यात वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोलच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. अमोलचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून, केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांच्या अधीन राहून त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.