भाजप धर्माचे राजकारण करुन समाजांमध्ये भांडण लावण्याचे काम करत – हार्दिक पटेल

मुंबई: मोदी सरकार देशातील तरुणांना ड्रग्जच्या ढकलत असल्याचा आरोप काँग्रेसचे युवा नेते आणि गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केला आहे. मुंबई काँग्रेस गुजराती सेलतर्फे बुधवारी मुंबईत आयोजित गुजराती समाजाच्या स्नेहसंमेलनात त्यांनी हा आरोप केला. तसेच त्यांनी भाजप धर्माचे राजकारण करुन समाजांमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा देखील आरोप त्यांनी केल.

देशातील शिक्षित तरुण बेरोजगार आहेत, ते भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवायला नको, म्हणून त्यांना दारू आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात ढकलण्याचे कारस्थान मोदी सरकार करत आहे, असा आरोप हार्दिक पटेल यांनी केला. काही दिवसांपूर्वी मुंबईत शाहरुख खानच्या मुलाजवळ सापडलेल्या अमली पदार्थाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. त्याचीच चर्चा सर्वत्र सुरू होती. या काळात गुजरातमधील मुंद्रा बंदरावर २१ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. पण, याबाबत कोणतीही चर्चा, चौकशी झाली नाही! हे सर्व का केले जात आहे? ते कोण करत आहे? त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे, असे हार्दिक पटेल म्हणाले.

स्वत:ला हिंदूंचा मसिहा म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या बॅनरवर राम रावणाचा वध करत असल्याचे चित्र असल्याचे पटेल म्हणाले. पण, त्यांनी कधीही त्यांच्या बॅनरवर राम शबरीची बेरी खात असल्याचे चित्र लावले नाही. धर्माच्या रक्षणासाठी रामाने राक्षसांशी युद्ध केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते नेहमी सांगतात. पण, रामाने शबरीची बेरी कोणत्या करुणेने खाल्ली त्याबद्दल ते कधीच काही सांगत नाही. प्रभू श्री रामाच्या करुणा आणि दया या गुणांबद्दल ते कधीही बोलत नाही, किंवा त्या गुणांचा ते स्वतः आचरण करत नाहीत, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली.

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आज देशातील १४० कोटी जनता महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचारासारख्या समस्यांना तोंड देत आहे, याची आठवण करून देण्याची गरज आहे. मात्र मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली हिंदू-मुस्लिमांच्या भावना भडकावून त्यांना आपसात भांडायला लावत आहे. देशात शांतता असेल तेव्हाच देशाचा विकास होईल हे सत्य आहे, असे हार्दिक पटेल म्हणाले.