हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी

मुंबई: तामिळनाडूच्या कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमधील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचे आज बुधवारी निधन झाले. वरूण सिंह यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बंगळुरू येथे उपचार सुरू होते. अल्पावधीतच त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांना एअरलिफ्ट करून बंगळुरू येथे आणण्यात आले होते.

पण उपचारादरम्यान त्यांच्याकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. हेलिकॉप्टर दुर्घटनेत वरूण सिंह हे मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यासोबतचे सीडीएस बिपीन रावत आणखी १३ जणांनी या दुर्घटनेत आपले प्राण गमावले होते. वरूण सिंह यांची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती जाहीर केली आहे. बंगळुरूच्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांना शौर्य चक्राने नुकतेच सन्मानित करण्यात आले. तेजस एअरक्राफ्टमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीनंतरही त्यांनी अतिशय शौर्य दाखवत तेजस एअरक्राफ्टचे सेफ लॅण्डिंग केले होते. सिंह हे वायुदलाच्या डिफेन्स सर्व्हीस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनमध्येही मार्गदर्शक होते. तसेच २०१९ मध्ये भारताच्या अवकाश मोहिम गगनयानच्या पहिल्या १२ जणांच्या यादीतही वरूण सिंह यांचा समावेश होता. पण आरोग्याच्या निकषामुळे त्यांना या मोहीमेवर जाण्याची संधी मिळाली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!