धक्कादायक बातमी! नवी मुंबईतील शाळेत कोरोनाचा उद्रेक;16 विद्यार्थी आढळले पॉझिटिव्ह
मुंबई: मुंबईतील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी हजेरी देखील लावली आहे. असे असतानाच नवी मुंबईतील एका शाळेत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. एकाच शाळेतील सुमारे 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परदेशातून मुंबईत आलेल्या नागरिकांच्या मुलाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्यानंतर राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 01 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असे मंत्रिमंडळ बैठकीत निष्पन्न करण्यात आले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे शाळा सुरू करण्यास काही काळ विलंब झाला. मुंबईत 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.
घणसोली येथील शेतकरी समाज शिक्षण संस्थेच्या शाळेत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. मागील 2 दिवसांत या शाळेत 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. परदेशातून परतलेल्या एका विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात तब्बल 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.