दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ; बोर्डाकडून नव्या तारखा जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कांसह 26 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहे. तर 1 जानेवारीला विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन तारखांनुसार आता विलंब शुल्कासह 1 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. यापूर्वी नियमित शुल्कासह 20 डिसेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह 28 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. पण आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 26 डिसेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह 27 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील सर्व शाळांना ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यास मुदतवाढ दिल्याचे आदेश देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान दहावीची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली होती.