मुंबई शहरात आठ दिवसांची जमावबंदी, नव वर्षांच्या स्वागतावर निर्बंध
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. डेल्टानंतर आता ओमिक्रानचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. विशेष म्हणजे नव वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच जय्यत तयारी सुरू असून, अनेक ठिकाणी पार्ट्या केल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे आता मुंबईत जमावबंदी लागू झाली असून, नव वर्षाच्या म्हणजेच 7 जानेवारीच्या शुक्रवारपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. पाचपेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यांसारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी एकत्र होता येणार नाही. त्यामुळे नव वर्षाचं स्वागत अनेकांना घरी राहूनच करावं लागणार आहे. जर कोणीही या नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी जागोजागी नाकेबंदी केली असून, घोळक्यानं ये-जा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
“30 डिसेंबर 2021च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील,” असं आदेशात म्हटलंय. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.