“12 कोटींची मर्सिडीज वापरणाऱ्याने, आता आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार करू नये”; संजय राऊतांचा मोदींवर घणाघात
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात नुकतीच 12 कोटींची जर्मन बनावटीची मर्सिडीज दाखल झाली आहे. त्यावरुन शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोकठोक मोदींवर टीकास्त्र डागले आहे. प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची 12 कोटींची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण यापुढे त्यांनी फकीर असल्याचा पुनरुच्चार करू नये, असा टोला राऊतांनी लगावला आहे. तसेच 2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? असा खोचक सवालही राऊतांनी केला आहे.
मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात, म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा करोना वाहून गेला नाही. तो कायम आहे. 2020 वर्ष मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. 2021 अनेक जळमटं तशीच ठेवून सरलं आहे.
मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाडय़ा वापरतात. पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची ऍम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे.
मावळते वर्ष आणि नव्या वर्षात फरक करण्यासारखी परिस्थिती नाही. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करणे आता अशक्यप्राय बनले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत.