सहकार क्षेत्रात कोणतंही राजकारण नको म्हणून आम्ही एकत्र लढतोय- प्रवीण दरेकर
मुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज (दि.२) रविवार निवडणूका आहेत. बँकेच्या चार जागासांठी मतदान होणार असून एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार पॅनेलमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. त्यामुळे या सहकार क्षेत्रात राजकारण नको म्हणून एकत्र लढतोय, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.
प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सहकाराच्या प्रांगणात राजकीय जोडे बाजूला ठेऊन सहकारासाठी काम करा. पक्षापलीकडे जाऊन हा संदेश सहकाऱ्यातील धोरण व महाराष्ट्रात दिला आहे. त्याचाच आदर्श घेत आणि सर्वांना सोबत घेऊन सहकार पॅनेल यांनी या ठिकाणी मिळून पॅनेल केलं.
शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, सुनील राऊत, नंदकुमार काटकर आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही १७ जागा बिनविरोध आहेत. परंतु उर्वरीत जागा लढवण्यासाठी ही निवडणूक होत आहे. परंतु त्या चारही ठिकाणी आम्हाला यश मिळेल. यामध्ये कोणतीही शंका नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.
सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना असा संघर्ष होता. परंतु यामध्ये भाजपने सर्वाधिक जागेवर मुसंडी मारली. मात्र, सिंधुदुर्गानंतर एक वेगळचं चित्र मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये पहायला मिळेल का, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता दरेकर म्हणाले की, सर्वप्रथम सहकार क्षेत्रात एकत्र निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु जर त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. तर त्याजागी निवडणुका घेतल्या जातात. त्यामुळे मला वाटतं ७० ते ८० टक्के यश सर्वांसोबत निवडणूक लढवताना आलं. मात्र, आता केवळ चार जागांसाठी ही निवडणूक होत आहे.