सिंधुताई सपकाळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण

6

मुंबई: अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने मंगळवारी पुण्यात निधन झाले. पुण्याच्या कोथरूड येथील गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सारेच हळहळले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताईंच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्वीटरच्या माध्यमातून सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली.

‘ डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे समाजसेवेतील योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी त्या सदैव स्मरणात राहतील. अनेक अनाथ मुलांच्या त्या आधार बनल्या. त्यांना सन्मार्ग दाखवला. त्यांचे आयुष्य घडवले. उपेक्षित समाजासाठीही त्यांनी भरीव असे काम केले. त्यांच्या निधनाने मला व्यक्तीश: अतीव दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो फोटोही पंतप्रधानांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली – राज्यपाल

‘सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो’, अशा शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली – अजित पवार

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

महाराष्ट्र एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला – देवेंद्र फडणवीस

आज खरोखर एक माता आपल्यातून निघून गेली आहे. समाजातील शेवटच्या माणसासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे. ही क्षती कधीही भरुन येणारी नाही. दुसऱ्या सिंधुताई होणे नाही. पण आता त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे’, अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

दीन-दुबळ्यांचे हक्काचे आशा स्थान काळाच्या पडद्याआड गेले

‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…’ असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई! माईंच्या जाण्याने अनाथ, दीन-दुबळ्यांचे हक्काचे आशा स्थान काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण आदरांजली माई…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.