पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात म्हाडाच्या ४ हजार २२२ घरांची सोडत ऑनलाईन पद्धतीने पार पडली आहे. सर्वांसाठी घर हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकार प्राधान्याने राबविणार असून म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे.
पुण्यातील जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानातील कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली होती.
पुणे #म्हाडा च्या ४२२२ नवीन सदनिकांची सोडत संपन्न. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती. सर्वांसाठी घरं हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकार प्राधान्याने राबविणार. म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास राज्य शासन कटिबद्ध – @AjitPawarSpeaks #MHADALottery pic.twitter.com/qvCeH67KrV
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 7, 2022
सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यामुळे बांधकाम क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळाली. राज्यातल्या सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरं’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काची घरं देण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हेच मोठे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.