तिसरी लाट थोपविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सज्ज; कोविड सेंटर पुन्हा सुरु होणार!

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तिसरी लाट थोपविण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय 15 जानेवारीपासून पुन्हा 800 बेडसह सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 600 बेड ऑक्सिजनयुक्त, 200  आयसीयू बेड उपलब्ध राहणार आहेत. तसेच घरकुल, चिखली येथील B10 बिल्डींगध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने इतर कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जुलै 2020 मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात जम्बो रुग्णाल रुग्णालय उभारण्यात आले. पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने हे जम्बो रुग्णालय 15 सप्टेंबर 2021 पासून जम्बो रुग्णालय बंद करण्यात आले होते.

आता शहरात पुन्हा कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जम्बो रुग्णालय 15 जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयात बेडची संख्या 800 एवढीच ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये 600 बेड ऑक्सिजनयुक्त आणि 200 बेड आयसीयू असणार आहेत.

कोविडची लक्षणे आढळल्यास त्वरीत टेस्टिंग करुन घ्यावे. महानगरपालिकेच्या 8 झोनल रुग्णालयामध्ये ( भोसरी रुग्णालय, सांगवी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, तालेरा रुग्णालय व यमुनानगर रुग्णालय) येथे टेस्टिंगची सोय मोफत करण्यात आलेली आहे. जम्बो कोविड सेंटर व ऑटोक्लस्टर सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती करण्यात येणार नसून त्यासाठी महापालिकेच्या वरील 8 रुग्णालयामधून संदर्भित केलेली चिठ्ठी घेणे आवश्यक आहे.