पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली, आता १४ ऐवजी २० फेब्रुवारीला होणार मतदान
दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला अखेर सुरूवात झाली आहे. परंतु पंजाब विधानसभा निवडणुकांची तारीख बदलल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब विधानसभेसाठी आता १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी चार दिवस मतदान पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संत रविदास जयंती असल्याने निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री चन्नी, भाजप आणि पंजाब लोक काँग्रेस पक्षाच्या पत्रावर चर्चा करण्यात आली. सर्वांनीच १६ तारखेला गुरु रविदास जयंती असल्याने मतदानाची तारीख चार दिवसाने पुढे ढकलण्याची मागणी केली होती. बहुजन समाज पार्टीने सर्वात आधी ही मागणी उचलून धरली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत निवडणुकांच्या तारखा बदलल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
येत्या १६ फेब्रुवारी रोजी रविदास जयंतीचा पावन पर्व आहे. त्यामुळे राज्यातील एक मोठा वर्ग आधीच वाराणासीत जाऊ शकतो. त्यामुळे मतदान घेतलं तर एक मोठा वर्ग मतदानापासून वंचित राहू शकतो. म्हणून मतदान चार दिवसांनी पुढे ढकलावं अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती.