पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक आज जाहीर होणार

मुंबई: कोरोना तिसऱ्या लाटेदरम्यान आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांची तारीख आज (8 जानेवारी) जाहीर होणार आहे. उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या जाणार आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3.30 वाजता 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कोणत्या तारखेला कुठे-कुठे मतदान होणार हे समजणार आहे.

यासोबतच नावनोंदणीच्या तारखा, छाननी, निकाल आदींची माहितीही उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोव्यात विधानसभेची मुदत संपण्याआधी या निवडणुका घेतल्या जातील. ज्या 5 राज्यात निवडणुका होणार आहेत त्यापैकी 4 राज्यांमध्ये भाजप प्रणित एनडीएचे सरकार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंग धामी, गोव्यात प्रमोद सावत, मणिपूरमध्ये नॉन्गथोम्बम बिरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांपैकी मणिपूर हे राज्य निवडणूक आयोगासाठी एक आव्हान बनले आहे. कारण मणिपूरमध्ये आतापर्यंत फक्त 45 टक्के लोकांनाच कोरोनाचे दोन्ही डोस मिळू शकले आहेत, तर केवळ 57 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. अशा परिस्थितीत इथे कोरोनाच संसर्गाचा धोका आणखी वाढत आहे. त्यामुळे इथे निवडणूक कशी आयोजित करायची हाच निवडणूक आयोगासाठी चिंतेचा विषय आहे.