दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
नवी दिल्ली: भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आज आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे. एकूण पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्ली येथील राजपथावर चित्ररथाचे संचलन होत असते. या संचलनामध्ये विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. यावर्षी महाराष्ट्राचा “महाराष्ट्रातील जैवविविधता व जैव मानके” या चित्ररथाचे संचलन होणार आहे. चित्ररथ संचलनात सहभागी झालेल्या राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त #नवीदिल्ली येथील आंतरराज्यीय #सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री @AmitV_Deshmukh यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे. pic.twitter.com/YvkgOhXVsV
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 22, 2022
यावर्षीच्या स्पर्धेमध्ये एकूण १५ सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले होते. विविध राज्ये व केंद्र शासनाच्या विभागानी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे या स्पर्धेमध्ये सादरीकरण केले होते.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, यावर्षी या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातील भैरी भवानी परफॉरमिंग आर्टस् या लोककला समूहाने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण १४ कलाकारांनी भाग घेतला. चषकाच्या स्वरूपातील हे पारितोषिक, महाराष्ट्रातील जनता व कलेस समर्पित केलेले पारितोषक असल्याची भावना अमेय पाटील यांनी व्यक्त केली. या कला सादरीकरणामध्ये अमेय पाटील, भावना चौधरी, संजय बलसाने, शिल्पेश तांबे, सुशांत पवार, पारस बारी, हरिश्चंद्र कोटीयन, अशोक जिंका, हिमानी दळवी, प्राजक्ता गवळी, तेजस गुरव, विशाखा मोरे, वैदेही मोहिते, निधीशा सॅलियन, किरण जुवळे, अंकिता पाटलेकर या कलाकारांनी भाग घेतला. त्यांच्या या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबरच, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय व संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.