ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे: ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केलेल्या किर्ती शिलेदार यांचं आज ( शनिवारी ) निधन झालं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डायलिसिसचे उपचार सुरू असल्याने त्यांची तब्येत आणखी खालावली संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहिल अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे.
सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कीर्ती शिलेदार याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान – अजित पवार
ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार यांचे आज निधन झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कीर्तीताई यांचं निधनाने मराठी रंगभूमी आणि महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही’, असं अजित पवार म्हणाले आहेत.
‘ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काऋळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी आपल्या सुरेल गायन आणि सदाबहार अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. देशविदेशात स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. आई जयमाला आणि वडील जयराम शिलेदार यांचा कलेचा वारसा पुढं नेताना मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात योगदान दिलं. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.