झाडी, डोंगार हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत – अशोक चव्हाण

मुंबई: अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगला वादळी ठरला आहे. सत्ताधारी आणि विरोध एकमेंकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शहाजीबापू यांच्या शैलीत शेकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, झाडी, डोंगार हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत. अशा शब्दात त्यांनी चिमटा काढला आहे. तसेच यंदाची अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुराने शेती व पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले. शेतीच्या हानीचे योग्य पंचनामे झालेले नाहीत. प्रशासनाने केवळ नदी व नाल्यांच्या काठावरील पूरग्रस्त शेतीचेच पंचनामे केले की काय, अशी शंका आहे.
प्रत्यक्षात पिकांचे नुकसान सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 13 हजार 600 रूपयांची मदत पुरेशी नाही. एवढ्या रक्कमेतून शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघत नाही. राज्यात 2 हेक्टर व त्याहून कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 80 टक्के आहे. त्यामुळे मदतीसाठीची जमीनधारणा मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचा 80 टक्के शेतकऱ्यांना काहीच लाभ होणार नाही.