माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे… अशोक चव्हाण यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात केली तक्रार दाखल

काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्ति पाळत ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. या प्रकरणी चव्हाण यांनी नांदेडचे  अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेत लेखी तक्रार दाखल केली आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले कि,  मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. या बाबीची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही मला मिळाले होते. त्यामुळे मी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे.
आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने मी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली. ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले, त्याअर्थी पुढील काळात खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन व जनतेत गैरसमज निर्माण करण्यासाठी हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा माझा संशय आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि नांदेडमध्ये माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशीही शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी दखल घेऊन तातडीने कायदेशीर दृष्ट्या योग्य कार्यवाही करावी, अशीही माझी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!