पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली : पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस यांनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी मंत्र्यांचे आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले. लवकरच राज्य शासनाचे संबंधित कंपनी आणि केंद्राचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल असेही फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राची दोन ऐतिहासिक शहर जोडण्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल – रेल्वेमंत्री
पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या शहराच्या आर्थिक स्थितीला गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुकही त्यांनी केले.