कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

30

मुंबई : ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन व्यापार व आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली. कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करण्यावर भर देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

यावेळी भारतातील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण आर्थिक संबंध वाढविण्याबाबत तसेच अत्याधुनिक नवकल्पना निर्माण करण्याच्या दृष्टीने व्यवसाय आणि भारतातील संभाव्य गुंतवणूक वाढवणे, अशा विविध विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भातही यावेळी चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी राज्यातील कौशल्य विकास विद्यापीठाबरोबर ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल. या माध्यमातून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उभारण्यास नक्कीच उपयोग होईल. तसेच पेन्शन फंडस् संदर्भात व सिंचन क्षेत्रातील कामांसाठीही ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल म्हणाले,  भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विविध क्षेत्रात सहकार्याची परंपरा आहेच. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठीही विविध पावले उचलली जात आहेत. वस्त्रोद्योग तसेच ज्वेलरी उद्योग यामध्ये भारत जागतिक स्तरावर पुढे येत आहे. तंत्रज्ञान, नावीन्यता, कल्पकता या सर्व स्तरावर सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्या आगामी भारत आणि विशेषतः मुंबई दौऱ्यासंदर्भातही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती दिली.

उद्योजकांना आवश्यक सहकार्यासाठी राज्य शासन कटिबद्ध

उपमुख्यमंत्रीफडणवीस म्हणाले, सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरणही प्राधान्याने राबविण्यात येत आहे. गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात जमीन, पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क, समृद्धी महामार्गालगत औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी आहेत. राज्यात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. समृद्धी महामार्ग, ॲक्सेस कंट्रोल हायवे, जे एन पी ए बंदराचा विकास, लॉजिस्टिक सहकार्यासाठी  फ्रेट रेल्वे यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.  उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज अनेक कंपन्या महाराष्ट्रात आपले उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अधिक पुढाकार घ्यावा. गुंतवणुकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उद्योग करण्यामध्ये (डुइंग बिझनेस मूल्यांकन) महाराष्ट्र अव्वल आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.