नवतंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी करावा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
वर्धा : विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती जागरुक करुन नवतंत्रज्ञान व संशोधनाचा वापर करत नवनवे प्रयोग करावे. समाजासाठी हितकारक होईल, असे कार्य विद्यार्थ्यांनी सतत करत राहावे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन ॲन्ड रिसर्च संस्थेच्या वतीने जिज्ञासा लॅब व अनुकृती लॅबच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती दत्ता मेघे, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन, सागर मेघे, कुलगुरु ललीत वाघमारे, अधिष्ठाता अभय गायधने, श्वेता पिसुळकर, राजु बकाने यांची उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, आयटी, मॅकेनिकल इंजिनिअर व मेडिकल या तिन्ही क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपआपल्या ज्ञानाचा उपयोग संशोधनामध्ये केल्यास एक मोठी वेल्थ निर्माण होऊन देश समृद्ध होण्यास मदत मिळेल. प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी भविष्याची आव्हाने ओळखून अपडेट होणे ही काळाची गरज आहे. दत्ता मेघे इन्स्टिट्यूटने नॉलेज टू वेल्थ निर्माणाची भावना विद्यार्थ्यामध्ये रुजविण्याचे प्रयत्न केल्यास अमेरिकेसारखे महत्त्वाचे तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित होण्यास मदत होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासुन गोरगरीब रुग्णाला सेवा देण्याचे कार्य केले जात आहे. यासोबतच रुग्णसेवा, शिक्षणासह पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम संस्था करीत आहे. गडकरी हे कायदाभिमुख विकास पुरुष आहे. रस्ता आणि शिक्षण क्षेत्रात विकासाचे कार्य करीत आहे. अनेक अडचणींचा सामना करुन वैद्यकीय महाविद्यालया सोबतच मोठे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तन मन धनाने काम करावे व आपले जीवन समृध्द करावे, असे दत्ता मेघे म्हणाले.
तत्पुवी नितीन गडकरी यांनी जिज्ञासा व सॅम्युलेशन लॅबचे फित कापून उद्घाटन केले व विविध विभागाची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ललीत वाघमारे यांनी केले तर आभार सागर मेघे यांनी केले.