सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोड मार्गावरील वाहतूक कोंडी होणार दूर… विकास आराखड्यास मंजुरी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जेव्हापासून पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तेव्हापासून अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांना यश आले आहे. पुण्यात महत्वाची समस्या आहे ती म्हणजे वाहतूक कोंडी. चंद्रकांत पाटील यांनी आतपर्यंत पालकमंत्री म्हणून विविध मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठका घेऊन त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली. सध्या सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोड मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी मार्ग काढण्यात आला.
कोथरूडमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध पर्याय महापालिकेच्या माध्यमातून समोर आले होते‌. सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोड मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याची मागणी सातत्यानं होत होती. पण या मार्गावरील बहुतांश जागा किर्लोस्कर कमिन्सच्या मालकीची असल्यानं जमीन अधिग्रहणाचा मोठा प्रश्न होता, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिरच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता किर्लोस्कर कमिन्सच्या मदतीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार आहे. आणखी रूंद करून हा रस्ता २० मीटरचा होणार आहे. जुलै २०२३ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचं बांधकाम विभागाचं नियोजन आहे. हा रस्ता पूर्ण होताच या भागातला वाहतूक कोंडीचा प्रश्न निश्चितच सुटू शकेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.