“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”

9

पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या पोटनिवडणुकांकडे विशेष लक्ष दिलं आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले सातत्याने या पोटनिवडणुकांचा आढावा घेतांना दिसत आहेत.  यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा असून आज ते खासदार गिरीश बापट यांची भेट घेणार आहेत.

मागील काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट आजारी आहेत. आजारी असतांना देखील त्यांनी अलिकडे झालेल्या हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. यातच आज अमित शहा रात्री नऊ वाजता खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे नकळतपणे या भेटीनंतर हेमंत रासने यांची ताकद वाढणार असून विरोधकांमध्ये धास्ती भरली आहे.

अमित शहा पुण्यात पोटनिवडणुकांसाठी कोणतही सभा घेणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यातच देशातील भाजपच्या राजकारणातील अमित शहा यांना ‘चाणक्य’ म्हणून ओळखलं जातं. अमित शहा पुण्यात येणार म्हणजे काहीतरी धमका होणार, हे विरोधकांना चांगलचं ठाऊक आहे. त्यामुळे ते गिरीश बापटांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पोटनिवडणुकांचा आढावा घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं काल नागपुर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. त्यानंतर ते आज पुण्यात दाखल झाले असून सायंकाळी पंडीत फॉर्म्स याठिकाणी मोदी@20 या पुस्तकांचं अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ते रात्री ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन गिरीश बापटांच्या घरी जाणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.