एका व्यक्तीने संपूर्ण पक्षच चोरला आणि दुसऱ्या पक्षाच्या मांडीवर नेऊन ठेवला- जयंत पाटील यांचे टीकास्त्र

7
चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभेस संबोधित केले. या देशात २०१४ नंतर वेगळेच वारे वाहू लागले आहेत. भावनाहीन भाजपला सत्तेची हाव लागली आहे. पंढरपूर-मंगळवेढा, अंधेरी पोटनिवडणूक त्याचे ताजे उदाहरण आहे. मात्र या सगळ्यात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब होत आहे,अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
राज्यात सहा महिन्यापूर्वी अत्यंत विचित्र पद्धतीने महाराष्ट्रातील लोकप्रिय महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. एका व्यक्तीने संपूर्ण पक्षच चोरला आणि दुसऱ्या पक्षाच्या मांडीवर नेऊन ठेवला. ज्यांनी बंड केला त्यांनी सांगितले की आमची घुसमट होत होती, हिंदुत्वासाठी जात आहोत. मात्र सत्यता काय आहे याची गावागावात चर्चा रंगत आहे.
भाजप सत्तेच्या नशेत इतका मश्गुल झाली आहे की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मानसन्मानाचेही काही पडले नाही. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा, महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा चंगच जणू या लोकांनी बांधला आहे.
मोठे प्रकल्प इतर राज्यात वळवले जात आहेत. या सरकारने आपल्या हातचे काम आणि तोंडचा घास पळवला अशी भावना तरुणांमध्ये आहे. देशात अघोषित आणीबाणी सुरू झालेली आहे. लोकांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, निवडणूक आयोग अशा स्वायत्त संस्था खिशात घालण्याचा कार्यक्रम पद्धतशीरपणे सुरू आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.
ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे. महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची, बिघडलेल्या वातावरणात सुधारणा करण्याची, गद्दारांना आणि महाराष्ट्राद्रोहींना धडा शिकवण्याची, या मातीविषयी असलेले प्रेम दाखवण्याची…त्यासाठी आपण सर्वांनी मिळून कसबा आणि चिंचवड येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात, असे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.