जे फक्त ऑनलाइन असतात त्यांना कायमस्वरूपी ऑनलाइनच ठेवण्याचे काम जनता नक्कीच करेल, एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र

3
पुणे शहरातील कसबा मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीत शुक्रवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात प्रचार रॅलीत सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना ,भाजप ,आरपीआय युती चे उमेदवार हेमंत रासने यांनाच बहुमताने विजयी करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले.
शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कसबा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचा अभेद्य गड असून तो अभेद्य रहायला हवा असे आवाहन याप्रसंगी शिंदे यांनी मतदार बांधवांना केले.
एकनाथ शिंदे यांनी म्हटले कि, मुख्यमंत्री सभेऐवजी प्रचार रॅली का काढतात असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विचारला जातो, मात्र आपण जनतेत मिसळून काम करणारे मुख्यमंत्री असल्याने थेट लोकांशी संपर्क ठेवत असल्याचे यासमयी निक्षून सांगितले. माझ्या तोंडून चुकून एखादे वाक्य निघाले, की ते व्हायरल केले जाते मात्र मी केलेल्या चुकांसाठी मला कृष्णा नदीकाठी प्रीतिसंगमावर जाऊन प्रायश्चित्त करण्याची वेळ कधीही आलेली नाही असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच जे फक्त ऑनलाइन असतात त्यांना कायमस्वरूपी ऑनलाइनच ठेवण्याचे काम जनता नक्कीच करेल असे सांगून त्यांचाही समाचार घेतला. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही असेही याप्रसंगी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेले सरकार आम्ही आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत आणले असून त्यामाध्यमातून अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे यासमयी सांगितले. पुणे शहरातील जुन्या वाड्यांचा प्रश्न, हेरिटेज इमारतीचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊन वाढत्या वाहतूक कोंडीवर रिंग रोडद्वारे पर्याय देण्यात येणार आहे. त्याकरिता जमीन अधिग्रहणाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल असे यावेळी नमूद केले. त्यासोबतच पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्याला गती देण्यात येईल तसेच कसब्यातील पुण्येश्वराचा प्रश्न नक्की सोडवू असेही याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
रॅलीननंतर कसब्यातील नागरिकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री कसबा गणपतीचे मनोभावे दर्शन एकनाथ शिंदे यांनी घेतले. तसेच कसबा गणपती संस्थानच्या वतीने केलेल्या सन्मानाचा विनम्रतापूर्वक स्वीकार केला.
याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार माधुरी मिसाळ, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, त्यांचा मुलगा कुणाल टिळक, पुतण्या रोहित टिळक, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, शिवसेना सह-संपर्कप्रमुख अजय भोसले, शिवसेना पुणे शहराध्यक्ष प्रकाश भानगिरे, युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय पक्षाचे पुण्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कसबा विधानसभा क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.