एका संस्थेने १०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपत खेळाडू घडवण्याचे कार्य करणे, ही कौतुकास्पद बाब – मंत्री चंद्रकांत पाटील

19

पुणे : कोथरूड येथे सन्मित्र संघ, पुणे या संस्थेच्या शतकपूर्ती निमित्त १०० खेळाडूंच्या प्रशिक्षण संकल्पाचे पूर्णत्व आणि स्थानिक नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते संस्थेच्या यशवंत खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. एका संस्थेने १०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपत खेळाडू घडवण्याचे कार्य करणे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय क्रीडाप्रेमी असून ते खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. याच पावलावर पाऊल टाकत, महाराष्ट्र सरकारनेही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना थेट ‘क्लास १’ अधिकारी म्हणून शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या धोरणामुळे आज अनेक नामवंत खेळाडू शासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत असून, यामुळे तरुण खेळाडूंना मोठे पाठबळ मिळत असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस आणि सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि श्री छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते जगन्नाथ लकडे, नगरसेवक राघवेंद्रबापू मानकर, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. वासंती जाधव, भाजपा नेत्या प्रा. डॉ. अनुराधा एडके, संस्थेचे अध्यक्ष माणिकराव हळबे, कार्याध्यक्ष दिवाकर निमकर, सचिव वसंत कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.