संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची सभागृहात भाजपाची मागणी
खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत केलेले वक्तव्य त्यांना भोवणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. संजय राऊत आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना राज्यात विधिमंडळ नाही तर चोरमंडळ, अशी टीका त्यांनी केली. यावरून राजकीय वर्तुळात वातावरणानं तापले आहे. राज्य सरकारने याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल आहे. या मुद्द्यांवरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटले कि, संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. एखाद्याचा राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र या विधिमंडळाचा अभिमान सभागृहातील सर्वच सदस्यांना आहे. विधिमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्टाचा अपमान आहे. महाराष्ट्र द्रोह आहे, असे शेलार यांनी म्हटले.
अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देत मागणी केली आहे कि, राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करावी. यावर आता सभागृहात काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.