गोरेगाव फिल्म सिटी बॉलिवूड पार्क टूरची माहिती देण्यासाठी मराठी भाषिक गाईड त्वरित उपलब्ध करून वेबसाइट मराठी भाषेत करावी; भाजपा चित्रपट आघाडी सरचिटणीस केतन महामुनी यांची मागणी

मुंबई : महाराष्ट्र रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळच्या मार्फत गोरेगाव दादासाहेब फाळके फिल्मसिटी मध्ये पर्यटनाला चालना देण्याकरिता बॉलिवूड पार्क अंतर्गत विविध पॅकेजेस बनवून पार्कची टूर आपल्या महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येत असून नागरिकांचा विविध देशातील तसेच आंतरराज्यातील नागरिकांचा त्यास उत्फुर्त प्रतिसाद आहे. ज्या प्रकारे अनेक राज्यातून हि पर्यटक मंडळी बॉलिवूड पार्क पाहण्यासाठी येतात तसेच ती महाराष्टातूनही मोठ्या प्रमाणात येत असतात. नुकतेच एक व्यक्तीने तेथील बॉलिवूड पार्क मध्ये मराठी भाषिक गाईड उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली त्यास त्वरित प्रतिसाद देत भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस केतन महामुनी यांनी महाराष्ट्र रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे यांच्याकडे या संदर्भात मागणी केली आहे.
आपल्या निवेदनात महामुनी यांनी म्हटले आहे कि नुकत्याच एका पर्यटकाने माहिती दिली कि येथील राईड दरम्यान माहिती देण्याकरिता जो गाईड देण्यात येतो तो फक्त हिंदी व इंग्रजी भाषिक असून मराठी मध्ये माहिती सांगण्यासाठी तेथे पर्याय नाही. चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके या माणसाने निर्माण केलेल्या या चित्रपटसृष्टीची माहिती मराठीतच न मिळणे या सारखे दुसरे दुर्दैव नाही.
एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्रातच मराठी माणसाला असे अनुभव शासन दरबारी मिळत असतील तर ते आपण अत्यंत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.आपल्या महामंडळामार्फत या बॉलिवूड पार्क टूरची माहिती वेबसाइट ( https://bollywoodpark.in ) तसेच लोकेशनला डायरेक्ट येणाऱ्या पर्यटकांना देण्यात येत असते, आमची मागणी आहे कि जगातील सर्व भाषांमध्ये हि माहिती आपण द्यावी पण त्याआधी मराठी भाषेत हि वेब साईट आपण सुरु करावी किंवा भाषा निवडीचा पर्याय आपण द्यावा. यासोबतच ज्या बॉलिवूड टूर पॅकेज मध्ये माहिती देण्याकरीता आपण जो हिंदी – इंग्रजी भाषा येणारा गाईड आपण नेमला आहे त्यामध्ये मराठी भाषा येणाऱ्या गाईडचा देखील समावेश आपण त्वरित करावा. अशा प्रकारचे भाषा निहाय शो नेहरू तारांगण किंवा इतर ठिकाणी देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे आपल्या सोयीनुसार अपेक्षित भाषेच्या उपलब्ध वेळेनुसार पर्यटक याचा आनंद घेतील.
एकीकडे मराठीभाषेच्या प्रचार प्रसिद्धी साठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रमाद्वारे करोडो रुपये खर्च करणारे सरकार या मागणीचा गांभीर्याने विचार करते का हे येणाऱ्या काळात समजेल.