उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले १०० क्षयरुग्णांना दत्तक
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2023/03/patil-15-750x430.jpg)
कोल्हापूर : कोल्हापूरमधील काही क्षयरुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे सकस आहार घेणे शक्य होत नाही. अशा १०० क्षयरुग्णांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निक्षय मित्र म्हणून निक्षय पोषण योजनेंतर्गत फूड बास्केट स्वरूपात ६ महिने कालावधीसाठी त्यांना दत्तक घेतले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे सकस आहार घेणे शक्य होत नाही. घरातील कर्त्या व्यक्तीस क्षयरोग झाल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. या रुग्णांसाठी सवयंसेवी संस्था, व्यावसायिक कंपन्या, दानशूर व्यक्ती , गणेश मंडळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत चंद्रकांत पाटील यांनी १०० क्षयरुग्ण दत्तक घेतले.
या फूड बास्केट किट वाटपाचा कार्यक्रम दौलतनगर येथे तीनबत्ती चार रास्ता चौक येथे संपन्न झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक , माजी आमदार अमल महाडिक, नवोदिता घाटगे, राहुल चिकोडे , महेश जाधव, अशोक देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरात अजूनही २०० च्या वर क्षयरुग्ण पोषण आहाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना मदतीचा हात देऊन क्षयरोग उच्चाटनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन उपयुक्त रविकांत आडसूळ यांनी केले.