राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी करावी – चंद्रकांत पाटील

7
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय सल्लागार समितीची बैठक आयोजित केली होती. हि बैठक एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाज आणि देश समजून घ्यावा. त्यातून पुढील आयुष्यात समाज आणि देशासाठी योगदान द्यावे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमानुभव मिळतात. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी त्या-त्या गावांचे विषय समजून घ्यावेत. ते सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार करावा. तसेच समाज आणि देशाला जोडण्याचे काम तरुणांनी करावे, असेही पाटील यांनी सांगितले.
अलिकडे पर्यावरण हा विषय संवेदनशील झाला आहे. पर्यावरण संवर्धन, मुलींचे शिक्षण याविषयी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी. येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. तसेच दुर्गम भागात होणाऱ्या शिबिरास आवर्जून भेट देवू, असेही ते म्हणाले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सल्लागार राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे उपस्थित होते, तर विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.