भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची एकमताने निवड… रवींद्र चव्हाण पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणखी भक्कम करतील, असा विश्वास – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची आज एकमताने निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या भव्य पदग्रहण समारंभात पक्षाचे राज्य निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रवींद्रजी चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रसंगी रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, निवडणुकीचे पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय सरचिटणीस अरूणजी सिंग, राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मुंबई अध्यक्ष ॲड. आशिषजी शेलार, मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत रवींद्रजी चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रवींद्र चव्हाण यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. पक्षाची कोणतीही जबाबदारी निष्ठेने पूर्ण करणारे कट्टर व्यक्तिमत्व म्हणजे आमदार रवींद्रजी चव्हाण. आक्रमक नेतृत्व, हिंदुत्ववादी विचारधारेशी निष्ठा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निस्सीम भक्ती, संघटनकौशल्य, उत्तम वक्तृत्व आणि प्रशासनावर मजबूत पकड ही रवींद्रजींची वैशिष्ट्ये. आज या बहुआयामी व्यक्तित्वाची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. आपल्या संघटन कौशल्याने रवींद्रजी पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणखी भक्कम करतील, असा विश्वास आहे. त्यांना भावी कारकिर्दीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर बोलताना चव्हाण म्हणाले की, माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते ही फार मोठी गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्येच हे घडू शकते. ही जबाबदारी सोपविल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे, असे ते म्हणाले.
या पुढील काळात भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात न्यावयाची आहे. भाजपाची विचारधारा निर्मळ आणि प्रवाही आहे. देशासाठी अहोरात्र काम करूनही मोदी सरकारबद्दल अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी आपणा सर्वांना मोदी सरकारची तसेच राज्यातील महायुती सरकारची कामे जनतेपर्यंत न्यायची आहेत. आता 2029ची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आपल्याला तयारीला लागायचे आहे. रामभाऊ म्हाळगी यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला पायाला भिंगरी लावून, डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. आगामी काळात राज्यात भारतीय जनता पार्टीला सशक्त बनविण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले.