राज्यातील सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे हताश झाले आहेत, त्यामुळे ते आता संजय राऊतांची भाषा बोलू लागले आहेत – चंद्रकांत पाटील

40
पुणे  : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री मारहाण केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह तिची भेट घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडतूस नाही काडतूस हू मैं … असे फडणवीस म्हणाले. यासोबतच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले कि, उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत, अन्यथा जनताच धडा शिकवेल. राज्यातील सत्ता हातून गेल्यापासून ते हताश झाले आहेत. त्यामुळे ते आता संजय राऊतांची भाषा बोलू लागले आहेत. आपल्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. त्यामुळे शब्द जपून वापरावेत. आमच्या नेत्यांवर टीका कराल, तर जशास तसे उत्तर मिळेल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पूर्ण अपयशी होते. त्यांच्या मंत्र्याचे दाऊदबरोबर संबंध स्पष्ट झाले आणि त्याला तुरुंगात जावे लागले तरीही उद्धव ठाकरे त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढू शकले नाहीत. सत्तेसाठी त्यांनी लाळघोटेपणा केला. वाझेसारख्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही त्यांनी लाळघोटेपणा केला. अशा बेईमानविश्वासघाती आणि घरकोंबड्या व्यक्तीने मा. देवेंद्रजींसारख्या कर्तृत्ववान व्यक्तीबद्दल अशा रितीने बोलणे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी आज सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांना भाजपा शेवटची संधी देत आहे. आता पुन्हा त्यांनी आमच्या नेत्याबद्दल अशी टिप्पणी केली तर आम्हालाही मातोश्रीसमोर यावे लागेल आणि मग तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.