वक्फ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून सुधारणांचे आणखी एक पर्व सुरु – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रातील NDA सरकारने लोकसभेत बहुमताने संमत करून इतिहास घडवला. कोट्यवधी भारतीयांची मागणी असलेले हे विधेयक संमत केल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि या विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या राजकीय पक्षांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी याब बाबत मत व्यक्त करताना म्हटले कि, कलम ३७० रद्द करणे, ट्रिपल तलाक रद्द करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिराची उभारणी करून मोदीजींनी सरकारची इच्छाशक्ती वारंवार दाखवून दिली आहे. वक्फ सुधारणा विधेयक हा पुढचा टप्पा आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सुधारणांचे आणखी एक पर्व सुरु झाले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल. वक्फ बोर्डाला या आधी देण्यात आलेल्या अनिर्बंध अधिकारांमुळे असंख्य नागरिकांची होलपट झाली होती. त्यातून मुक्ती मिळेल हे स्पष्ट असल्याचे पाटील यांनी म्हटले.
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यांनंतर काल दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली. वक्फ सुधारणा विधेयक २०२४, वक्फ अधिनियम १९९५ मध्ये बदल करण्यासाठी मांडलेले विधेयक आहे. केंद्र सरकारकडून वक्फच्या संपत्तीचे व्यवस्थापन, पारदर्शकता आणि दुरुपयोग थांबण्यासाठी नियम कडक करण्याकरिता हे विधेयक लागू केले जात आहे.