भाऊंच्या TDM मधील ‘मन झालं मल्हारी’ गाणं रिलीज, पृथ्वीराज- कालिंदा जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस

5

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक भाऊराव कऱ्हाडे यांचा नवा चित्रपट ‘टीडीएम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटातील गाण्यांची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. टीडीएम चित्रपटातील ‘एक फुल वाहतो सखे’ या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. अशातच टीडीएममधील आणखी एक गाणं संगीतप्रेमींना आपलंसं करायला सज्ज झालं आहे.

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित टीडीएम चित्रपटातील “मन झालं मल्हारी” हे प्रेमगीत नुकतंच रिलीज झालं असून अल्पावधीतच या गाण्याने संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. ५ एप्रिल रोजी या गाण्याचा प्रोमो रिलीज करण्यात आला होता, ज्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. भाऊराव कऱ्हाडे यांच्या चित्रपटात नेहमीच तरुणांच्या मनाला साद घालणारी गाणी पाहायला मिळाली आहेत. भाऊंच्या ख्वाडा सिनेमातील तुझ्या रुपाचं चांदणं आणि बबनमधील मनं बहरलं या गाण्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं होतं. त्यामुळे टीडीएममधील “मन झालं मल्हारी” हे गाणे ऐकण्यासाठी प्रेक्षकांचे कान आसुसले होते. अखेर आज (६ एप्रिल) हे गाणं प्रदर्शित झालं असून गाणं ऐकून अनेक तरुण-तरुणींचं मन मल्हारी झालं आहे. ‘लै भारी मल्हारी’, ‘मल्हारी राडा करणार’ अशा शब्दांत श्रोते गाण्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

“मन झालं मल्हारी” या गाण्याला वैभव शिरोळे आणि कुणाल गायकवाड यांचे बोल लाभले आहेत. तर वैभव शिरोळे यांनीच गाण्याला संगीतही दिले असून प्रेमाची तरल भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याला त्यांच्यासह आनंदी जोशी यांच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे. गावाकडील प्रेमाची चाहूल लावणारं हे गाणं अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी निस्ताने यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. येत्या २८ एप्रिल रोजी भाऊरावांचा मराठी मातीतला टीडीएम प्रदर्शित होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.