चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे, प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन

9

पिंपरी : आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय चित्रपटांतून मांडले पाहिजे. या माध्यमातून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे. तर आणि तरच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा तेव्हा बाजूला राहतो, असे मत प्रसिध्द लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगवीत बोलताना व्यक्त केले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते यांच्या हस्ते कऱ्हाडे यांना दिशा कार्यगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास भाजप नेते शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे, गायक वैभव शिरोळे आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले की, ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. कोणताही चित्रपट करताना अडचणी येतातच. मलाही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मी त्याला सामोरा गेलो. शेतकरी हा सर्वात सहनशील घटक आहे. तो नेहमी आशेवर जगतो. कधीही उमेद सोडच नाही. मीही शेतकरी असल्याने त्याच वाटेने जातो. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास अडचणी नक्कीच दूर होतात. नवनवे मार्ग सापडत जातात. प्रश्न सुटत जातात. चांगली माणसं भेटत जातात. प्रामाणिकपणा आणि माणुसकीची कास सोडायची नाही, हे मात्र मनाशी ठाम असायला हवे. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते, असे भाऊराव यांनी सांगितले.

आजपर्यंतच्या वाटचालीत रसिक प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले. दिशा फाऊंडेशनकडून झालेला माझा सन्मान म्हणजे आपल्या माणसांकडून मिळालेले प्रोत्साहन आहे. कौतुक माणसाच्या अंगात दहा हत्तीच बळ देत असते, अशा भावना भाऊराव यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रास्ताविक जगन्नाथ शिवले यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. राजेश सावंत यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.