जब जिंदगी झंड होती है, तो पुना, बंबईही याद आती है…! ‘टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून गावातील संस्कृती, गावचा रांगडेपणा, स्थानिक-सामाजिक प्रश्नांवर बोलणारे चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधुनिकीकरणाच्या युगात गावाकडचे गावपण जपणारे चित्रपट आणणारा प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे पुन्हा एकदा अशाच एका चित्रपटासह आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. २८ एप्रिल रोजी भाऊचा ‘टीडीएम’ हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज होतोय.

तत्पूर्वी बुधवार (१२ एप्रिल) रोजी टीडीएमचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून अवघ्या काही तासांतच ट्रेलरला हजारोंमध्ये व्ह्यूज आले आहेत. नवोदित कलाकार पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने यांच्या टीडीएममधील गाण्यांनीच सिनेरसिकांना वेड लावले होते. मन झालं मल्हारी, एक फुल वाहतो सखे ही गाणी लोकांच्या मुखात होती. त्यामुळे टीडीएमच्या ट्रेलरची प्रेक्षक चातकाप्रमाणे वाट पाहात होते. अखेर बुधवारी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड येथे टीडीएमचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी मातीतला माणूस भाऊराव यांनी बँड-बाजाच्या धूमधडाक्यात ट्रॅक्टरमधून संपूर्ण टीडीएम टीमची सिटी प्राईडसमोरुन मिरवणूक काढली. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला पृथ्वीराज हातात केशरी झेंडा घेऊन ट्रॅक्टरमध्ये उभा होता. त्याच्यासह दिग्दर्शक भाऊराव आणि टीडीएमची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष म्हणजे, अभिनेत्री कालिंदीने ट्रॅक्टर चालवत कोथरुडकरांना सैराटमधील आर्चीची आठवण करुन दिली. धमाकेदार एंट्रीनंतर मोठ्या पडद्यावर बहुप्रतिक्षित ट्रेलर दाखवण्यात आला.

ट्रेलरवरुन लक्षात येते की, टीडीएम सिनेमात अभिनेता पृथ्वीराज विहीर खोदणाऱ्या आणि वाळू विक्री करणाऱ्या कुटुंबातील मुलगा आहे. वाळूचा मोठा व्यवसाय करत श्रीमंत बनण्याचे त्याचे स्वप्न असते. परंतु जिथे नायक आला तिथे खलनायकही आलेच… त्याचप्रमाणे गावातील काही लोक त्याच्या स्वप्नपूर्तीत आडकाठी करताना दिसतात. ट्रेलरमध्ये पृथ्वीराज आणि कालिंदीमध्ये हळूवार फुलत जाणाऱ्या प्रेमाचे काही क्षणही दाखवण्यात आले आहेत. तसेच रोमान्स आणि ड्रामाबरोबर प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारे ऍक्शन सीनही आहेत.

ट्रेलरमधील काही डायलॉग्सनी देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘जब जिंदगी झंड होती है, तो पुना, बंबईही याद आती है’…. पृथ्वीराजच्या या डायलॉगला प्रेक्षकांकडून टाळ्या, शिट्ट्यांनी दाद मिळाली. त्यामुळे सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा डायलॉग नक्कीच गल्लीबोळातील मुलांपासून शहरातील तरुणांच्याही तोंडात राहील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ट्रेलरचा शेवट टीडीएम म्हणजे काय? या प्रश्नाने होतो. आता या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना २८ एप्रिलला सिनेमागृहातच मिळेल.