राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे निकाल विहित मुदतीत जाहीर करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई: राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठातील परीक्षेच्या निकालाबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेले असते. त्यानुसार विद्यार्थी प्रवेशाचे नियोजन करतात. या पार्श्वभूमीवर पदवी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर होणे गरजेचे असते. निकाल वेळेत जाहीर झाले नाहीत, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांना ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा असतो त्या अभ्यासक्रमापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये,यासाठी सर्व अकृषी विद्यापीठांनी विद्यार्थी हितासाठी वेळेत निकाल जाहीर होतील याचे नियोजन करून पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करावे, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर , उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठाचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.