वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पैठणी विणकरांशी संवाद, समस्यांवर लवकरच तोडगा काढणार – चंद्रकांत पाटील
मुंबई : काल येवला पैठणी विणकरांच्या समस्यांबाबत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली. यावेळी पैठणी विणकरांशी संवाद साधून पाटील यांनी त्यांच्या समस्यांबाबत माहिती घेतली, यावर तोडगा काढण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
पैठणी विणकरांना रेशीम खरेदीवर राज्य शासनाने ३० टक्के सबसिडी द्यावी, यंत्रमागाच्या धर्तीवर हातमाग धारकांना सबसिडीने सौरउर्जा योजनेचा लाभ मिळावा, पैठणी विणकरांसाठी आरोग्य विमा योजना सुरू करावी, नकली पैठणी साडीला कायमचा पायबंद घालण्यासाठी ‘भौगोलिक सिम्बॉल’ची प्रभावी अंमलबजावणी करावी, पैठणीचा स्वतंत्र लोगो करावा, राज्य व केंद्र शासनाच्या पर्यटनस्थळांसह कार्यालयात पैठणीची माहिती पुस्तिका ठेवण्यात यावी आदी मागण्या पाठवणी विणकारांकडून करण्यात आल्या.
यावेळी उपथित विणकरांची वतीने पाटील यांचा भरजरी फेटा आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव श्री. वीरेंद्र सिंग, उपसचिव श्री. श्रीकृष्ण पवार, भाजपा युवा मोर्चा नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष श्री. रवींद्र मेघराज, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
