मुंबई : यंदाचा २०२३ चा विश्वचषक सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. ऑस्ट्रेलिया या विश्वचषकाचा मानकरी ठरला. परंतु भारतीय संघाने मात्र अद्भुत क्रीडा कौशल्य प्रदर्शित करत २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत सलग दहा सामने जिंकत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. अंतिम सामना जरी जिंकता आला नसला तरी देशातील प्रत्येक नागरिकाचे मन जिंकण्यात भारतीय क्रिकेट संघ यशस्वी झाला असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
विश्वचषक सामना पार पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीय संघाची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीवरून प्रेमाने मायेचा हात फिरवला. मोदींच्या या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, कोणत्याही क्रीडा प्रकारात जय आणि पराजय निश्चित असल्याने या स्पर्धेत भारताला पराजय स्वीकारावा लागला. काल सामना संपल्यावर संपूर्ण क्रिकेट मालिका विजिगीषु वृत्तीने खेळणाऱ्या आपल्या हरहुन्नरी क्रिकेटपटूंची मा. मोदीजींनी भेट घेतली. अशावेळी भावुक झालेल्या काही क्रिकेटपटूंच्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने मायेचा हात फिरवला तर काहींचा हात हातात घेऊन धीर दिला.
पाटील म्हणाले कि, मोदी म्हणजे यश लाभता शाब्बासकी आणि अपयशात मायेने धीर देणारे कुटुंबप्रमुख! असे प्रेमळ आणि विशाल हृदय असणारे नेते यांच्या नेतृत्वात काम करताना मनाला विलक्षण समाधान लाभते.
नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला प्रोत्साहन दिले. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन एक एक करून सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीवर थाप दिली. आपल्या उत्साहपूर्ण शब्दांनी मोदिंनी त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर टीम इंडियाला त्यांनी दिल्लीत येण्याचे निमंत्रण देखील दिले. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून देशभरातून मोदींचे कौतुक होत आहे.
Get real time updates directly on you device, subscribe now.