प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत , उच्च शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल शिक्षण पद्धतींचा प्रसार, महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांचा विकास या बाबींवर विशेष भर या बैठकीत देण्यात आला. दरम्यान, PM-USHA अंतर्गत मंजूर प्रकल्पांचे काम वेळेत व दर्जेदार करण्याच्या सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई,तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.